७१.
जनतेची अदालत
आहे सगळ्यात मोठी;
राहे पुकार्याला उभा
जनार्दन तिच्यासाठी.
७२.
दोष नाही गवंड्याचा,
आहे मालकाची चूक;
दोन माणसात भिंत
त्याला बांधण्याचा शौक.
७३.
वाईटात दडलेले
सदा चांगले असते;
पण हरेकाच्यापाशी
तशी नजर नसते.
७४.
नको नजराणा काही
माझ्या नजरेला भेट;
वाढदिवसाला हवी
हीच साधीसुधी भेट.
७५.
काय उद्याचा भरोसा
नको पडू त्या फंदात;
आज उगवला दिस
घाल मस्त आनंदात.
७६.
एकमेकांचे स्वभाव
एकमेकांत जिरले;
चव आणते कैरीला
जसे लोणचे मुरले.
७७.
काय देऊ तुला सखे
साध्या शब्दांच्या शिवाय;
माझ्या लेकरांसोबत
तूच झाली माझी माय.
७८.
कर नवी सुरुवात
झाले गेले विसरुन;
अरे चालता चालता
सावरावे घसरून.
७९.
पाय ठेव बळकट
असो कठीण चढाई;
जीव जिवात असेतो
लढ रोजची लढाई.
८०.
चाल सांभाळून बाई
कर जिवाचे राखण;
उलंगल्या वावरात
उभे धारदार फणं.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा