६१.
काय काढावे कोणाचे
उणेदुणे कोणापाशी;
तूच कितीक चांगला
जरा विचार मनाशी.
६२.
नको म्हणू कवितेला
फक्त यमकांचा खेळ;
शब्दाशब्दातून मिळे
मला जगण्याचे बळ.
६३.
तुम्ही शिकविली भाषा
तुम्ही घडविला पिंड;
शब्दाशब्दातून आता
अर्थ वाहतो उदंड.
६४.
पैशापैशाचा हिशेब
ज्याने वहीत लिहिला;
एक पैसाही सोबत
नाही मढ्यावर नेला.
६५.
कोण आहे बरोबर
काय कोणाचे चुकले;
याच वांझोट्या चर्चेत
सारे आयुष्य हुकले.
६६.
आले किती गेले किती
नाही फरक पडत;
कोणावाचून जगाचे
काही नसते अडत.
६७.
तळ हाताने झाकतो
सूर्य आपल्यापुरता;
लोक वाचतात पण
त्याच्या प्रकाशाची गाथा.
६८.
भल्या पहाटे ऎकावी
उंच स्वरात अजान;
सायंकाळी आरतीला
बंद करू नये कान.
६९.
तुझ्या अमृताची वाटी
थोडी सांडू दे ताटात;
चूकभूल माणसांची
घाल प्रेमाने पोटात.
७०.
तुझे उपकार माये
मला फेडू दे वो थोडे;
तुझ्या पायात घालू
माझ्या कातड्याचे जोडे.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा