८१.
मनासारखे आपल्या
जग नसते चालत;
वारा सुटल्याबिगर
पान नसते हालत.
८२.
झाले जगणे महाग
चूल पेटवावी कशी;
बिनातेलाची पणती
वातीसंगे उपवाशी.
८३.
गेली पाहता पाहता
रंधावनात जवानी;
चूल फुंकता फुंकता
आले डोळाभर पाणी.
८४.
तुझी आकाशाची माया
तुझे पृथ्वीचे सोसणे;
मनी लपवून दु:ख
जनी खुशाल हासणे.
८५.
झाले पिंपळाचे पान
डायरीत जाळीदार;
पानापानात शोधते
हरवला जोडीदार.
८६.
हवा होता जन्मभर
तुझ्यासोबत प्रवास;
तुझ्याविन कसेतरी
आता काढतो दिवस.
८७.
हीच एवढी दौलत
चारऒळी तुझ्यासाठी;
माझ्यानंतर सोबत
त्याच उभ्या तुझ्यापाठी.
८८.
केव्हातरी एकांतात
होता एक शब्द दिला;
तोच देईल एकट्या
जगण्याचा धीर तुला.
८९.
काहीतरी एकाएकी
तुला असे आठवेल;
आणि मौनाच्या काठाशी
तुझी पापणी झरेल.
९०.
माझ्या पिंडाला शेवटी
नाही कावळा शिवला;
मेल्यावर जीव माझा
होता तुझ्यात गुंतला.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा