१.
सखी,प्रेयसी,अर्धांगी
एक होऊन आलीस;
तूच राधा,तूच मीरा,
तूच रुक्मिणी झालीस.
२.
माझ्या अंगणात होते
तुझे पाऊल पडत;
वाटे अचानक आले
पान सोन्याचे उडत.
३.
नेते गुलाबी ओढणी
मन ओढत ओढत;
तिची साधीसुधी गाठ
नाही पिच्छाच सोडत.
४.
माझ्या आशेवानी तोही
नाही मेला सालोसाल;
जीव धरून मुठीत
होता इवला रुमाल.
५.
तुझ्या गालावर तीळ,
तुझ्या ओठांमध्ये गूळ;
गोड गोड बोलण्याचे
तुला भलतेच खूळ.
६.
तुझ्या बेसरीचा खडा
चमचम चमकला;
माझ्या अंधार्या मनात
त्याने उजेड पाडला.
Labels:
चार ओळी तुझ्यासाठी
७.
दाराहून येता जाता
भेटीगाठीचा बहाणा;
वेडा होतोच शेवटी
इथे कुणीही शहाणा.
Labels:
चार ओळी तुझ्यासाठी
८.
तुझ्या दारात मोगरा,
माझ्या घरात सुगंध;
तुझा माझ्याशी असेल
कोण्या जन्माचा संबंध.
Labels:
चार ओळी तुझ्यासाठी
९.
तुझ्या हासण्याने होते
माझी साजरी दिवाळी;
तुझ्या रुसण्याने चेते
माझ्या उरामधे होळी.
Labels:
चार ओळी तुझ्यासाठी
याची सदस्यता घ्या:
पोस्ट (Atom)


