४९.
नको नको लावू बाई
असा कपाळाला हात;
कर जरा हसून तू
माझी सुंदर प्रभात.
५०.
असा सुखाचा संसार
वाटे शेजार्याला हेवा;
नाही आणखी मागणे
तुझ्या पायापाशी देवा.
५१.
सहवासात कितीक
उजळले क्षण-क्षण;
दिस,मास,साल गेले;
गेली नाही आठवण.
५२.
पायी लावून तुक्याच्या
माळ घातली गळ्यात;
मला दिसली जिजाई
तुझ्या गहिर्या डोळ्यात.
५३.
तूच झाली इंद्रायणी,
तूच अभंगाची वही;
माझा बुडाला दगड
तुझी तरली पुण्याई.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा